business horoscope

ज्योतिषशास्त्राच्या आधारे करिअरची दिशा ठरवा…

“व्यवसाय करावा कि नोकरी?”

“कोणता व्यवसाय करावा?”

“बदली कि बढती?”

ह्या सारखे अनेक करिअरसंबंधी प्रश्न मला रोज विचारले जातात. खरंच ज्योतिष शास्त्र आणि ज्या प्राचीन भारतीय ऋषीमुनींनी ह्याचा पाय रचला त्यांना वंदन आहे कारण काळ कितीही बदलला तरी ह्या शास्त्राची तत्वे कोणत्याही काळात चपखल बसतात. ज्योतिष शास्त्राची निर्मिती साधारण कमीतकमी ४००० ते ५००० वर्षांपूर्वीची असावी. आपल्या अनेक धर्मग्रंथात ज्योतिषशास्त्राचे संदर्भ आढळतात. त्यावेळच्या समाजरचनेनुसार ह्या शास्त्राची निर्मिती केली गेली त्यामुळे आजच्या जमान्यात ह्या शास्त्राची तत्वे युक्तीने वापरावी लागतात. ह्या तत्वांची आपल्या आताच्या काळातील समाजरचनेनुसार सांगड घातल्यास अनेक समस्यांची उकल लीलया होते.

मनुष्याच्या अनेक गरजांपैकी त्याला सतत हवीहवीशी वाटणारी गरज म्हणजे धन, पैसा , मानमरातब. प्रत्येकाच्या गरज कमी जास्त प्रमाणात का होईना परंतु ह्या सर्व गोष्टींभोवतीच फिरत असतात. मनुष्य स्वभावाचा विचार करूनच, त्याला भविष्यात निर्णय घेण्यासाठी मदत व्हावी अथवा परिस्थितीची जाणीव व्हावी म्हणूनच ह्या शास्त्राची निर्मिती झाली असावी. धनार्जन संबंधी प्रश्न निकाली निघावेत, त्यावर यथायोग्य मार्गदर्शन व्हावे ह्यासाठी कुंडलीत दशमस्थानाचे फार महत्व आहे.

दशमस्थानचे महत्व काय?

दशमस्थानालाच कर्मस्थान म्हंटले गेले आहे. कर्म करून, कार्य करून स्वावलंबी होईन आणि त्यातून अर्थोत्पत्ती अशी मीमांसा ह्यास्थानाची करता येईल. प्रथमस्थानाखालोखाल ह्या स्थानाचे महत्व अधिक मानले गेले आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हि जीवनसाध्ये मनाली गेली आहेत. त्यापैकी अर्थ दर्शवणारे हे मुख्य केंद्र स्थान आहे.

व्यक्तीची एकूण सामाजिक प्रतिष्ठा हि त्याच्या आर्थिक सुब्बतेवरून अवलंबून मनाली जाते. त्यामुळे हे स्थान कीर्ती, प्रसिद्धी, नावलौकिक दर्शवते. ह्या स्थानाचा स्वामी नीचेचा, अथवा ह्या स्थानात नीचेचा ग्रह असणे म्हणजे कमनशिबीपणाचं म्हणावा लागेल. पूर्वकर्मानुसार ह्या जन्मी आपल्याला फार मुष्किलीनेच पैसे आणि नावलौकिक मिळेल हि खूणगाठ बांधावी. ज्यांच्या पत्रिकेत हे स्थान सुस्थितीत असते अशा भाग्यवान लोकांना लवकर करिअर साध्य होते.

दशमस्थानावरून करिअरची दिशा कशी ठरवली जाते?

दशमस्थान बलवान असल्यास व्यक्ती हि शक्यतो स्वतःचा व्यवसाय करण्यामध्ये उत्सुक असते. त्यांना दुसऱ्याच्या अधिपत्याखाली राहणे रुचत नाही. हेच स्थान बलवान नसल्यास व्यक्तींनी व्यवसाय करण्याचा हट्ट करू नये.

दशमस्थानात येणारी रास, तेथे येणारे ग्रह, ह्या स्थानावर असणारी ग्रहाची दृष्टी ह्यावरून व्यक्ती कोणत्या पद्धतीचा व्यवसाय करेल हे समजते. जातकाने कोणत्या प्रकारचा व्यवसाय केल्यास त्याला लाभेल हे सुद्धा समजते. लग्नकुंडलीतील ह्या ठोकताळ्यांना नवमांश कुंडली आणि दशमांश कुंडलीची जोड दिल्यास अनेक पटींनी उत्तम निर्णय करता येतो. आता प्रश्न येतो कि व्यवसाय कि नोकरी? तर दशमस्थान बलवान नसल्यास पण षष्ठ स्थान तुलनेने उत्तम असल्यास नोकरी केल्यास, नोकरीत भाग्योदय होतो. आता पाहूया कोणते ग्रह दशमस्थानात असल्यास अथवा दशमस्थानावर परिणाम करत असल्यास करिअर कशात उत्तम होऊ शकते.  

रवी – रवीसारखा तेजस्वी तारा तेथे असल्यास तो कोणाचे ऐकणार? तो स्वतःचेच निर्णय राबवणार. रवी हा लीडरशिप क्वालिटी देतो. तो अग्निजन्य आहे. समाज व्यवस्थेतला दिशा ज्ञाचे सामर्थ्य या ग्रहात आहे. अग्निजन्य असल्यामुळे यांत्रिकी गोष्टी ( electronics ) ह्याच्या अधिपत्याखाली येतात. अग्नी तत्वाची रास असल्यास ह्या व्यक्ती व्यवसाय उत्तम रीतीने सांभाळू शकतात. कठीण परिस्थितीत उत्तम निर्णय घेण्याची क्षमता ह्यांच्यामध्ये असते. नोकरीच्या बाबतीत सरकारी नोकरीसाठी प्रयत्न केल्यास यश मिळू शकते. तसेच खासगी नोकरीत उच्च पदस्थ होण्याचे योग असतात. परंतु सूर्यासारखा तेजस्वी ग्रह हा प्रामुख्याने लीडरशिपच चांगली दाखवतो. त्यामुळे आपण मागील लेखमालेत अटल बिहारी वाजपयी ह्यांच्या कुंडलीत पाहिले कि दशमेश सूर्याने गुरूबरोबर अग्निराशीत युती केल्याने त्यांनी भारतीय जनता पार्टीला दिशा दिली आणि ते दोनदा पंतप्रधान होऊ शकले. सूर्य आणि गुरु युती मुख्यत्वे समाजकारण आणि राजकारण ह्यातच यश दर्शवतात. त्यांच्या दशमस्थानाचे योग समजून घेण्यासाठी त्यांच्या नावावर क्लिक करा.      

मंगळ – मंगळ ह्या स्थानात स्थानबली होतो. मंगळ हा धडपड्या स्वभावाचा आहे, अग्निजन्य आहे. हट्टी आहे, क्वचित प्रसंगी दुराग्रही सुद्धा आहे. साहस, धाडस, धडाडी हे त्याचे विशेष गुण आहेत. त्यामुळे ज्या कामात अग्नीचा संबंध आहे, इलेक्ट्रिसिटी आहे. अशा गोष्टीच्या संबंधित त्यांना व्यवसायात यश येते. मंगल हा रक्ताचा कारक आहे पत्रिकेत शुक्र, रवी आणि वृश्चिक रास बलवान असल्यास वैद्यकीय क्षेत्रात यश मिळवता येते. मंगळ हा जमिनीचा आणि जमिनीतून उत्खनन होणाऱ्या गोष्टींचा कारक आहे. दशम स्थानावर मंगळाचा प्रभाव असल्यास जमिनीचे व्यवहार, बांधकाम, वाळूचे व्यवसाय, वीट व्यवसाय सारख्या व्यवसायात यश मिळते. नोकरीमध्ये पोलीस खाते, मिलिटरी खाते अशा साहसी आणि धडाडी आवश्यक असलेल्या फिल्ड मध्ये यश मिळते.

चंद्र – चंद्र ह्या स्थानात जलतत्वाविषयी चे व्यवसाय देतो. पाण्याच्या संदर्भातील व्यवसाय जसे मिनरल वॉटर तयार करणे, मासेमारी , मत्स्यशेती, कृत्रिम मोत्यांची शेती अशा व्यवसायात यश मिळते. चंद्र हा दुधाचा कारक आहे. त्यामुळे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ ह्यांचे उत्पादन, विक्री आणि व्यवसाय उत्तम चालतो. चंद्र हा स्त्री ग्रह असून घरगुती खाद्यपदार्थ, स्वयंपाक घर दर्शवतो. त्यामुळे महिलांचे खाद्यपदार्थांचे गृहउद्योग ह्याच्या अमलाखाली येतात. ह्या प्रकारच्या व्यवसाय प्रकल्पात नोकरी केल्यास जातकाला फायदा होतो.

शुक्र – दशमातील शुक्र हा स्त्रियांच्या वस्तूंच्या संदर्भात आणि चैनीच्या वस्तूंच्या संदर्भातील व्यवसाय दर्शवतो. कॉस्मेटिक, उंची वस्त्रे, आभूषणे, सुवासिक अत्तरे शुक्राच्या अमलाखाली येतात. चैनीच्या प्रकारात आयते खाद्यपदार्थ येत असल्यामुळे हॉटेल व्यवसाय शुक्राच्या अमलाखाली येतो. शुक्र कलेचा कारक असल्यामुळे अभिनय, चित्रकला, ग्राफिक डिझायनिंग हे व्यवसाय चांगले चालतात. उदाहरणार्थ , मागील लेखांमध्ये आपण ज्या पत्रिकांचा अभ्यास केला त्यात पहिले कि, अमिताभ बच्चन ह्यांच्या पत्रिकेत दशमेश मंगळाने शुक्राबरोबर युती केली आहे. तर अक्षयकुमार आणि संजय दत्त ह्यांच्या पत्रिकेत दशमात शुक्र आहे. दशमस्थानाचा संबंध शुक्राशी आल्यामुळे ते कलेच्या क्षेत्रात चमकलेत. अभिनेत्यांच्या कुंडल्यांचा पूर्ण अभ्यास पाहण्यासाठी त्यांच्या नावावर क्लिक करा.  

शनी – शनी हा ग्रह दशमस्थानावर प्रभाव टाकत असल्यास मुळातच व्यवसायापेक्षा नोकरी करण्याकडे काळ असू शकतो. शनी हा दास्यत्वाचा कारक आहे त्यामुळे नोकरी चांगली होऊ शकते. व्यवसाय करायचाच असल्यास तेल डेपो, तेलाचे उत्पादन, टायरचा व्यवसाय चांगले चालू शकतात.

बुध –  बुध हा बुद्धीचा आणि चिकित्सेचा कारक आहे. हिशोबीपणा, अचूकता, बोलणे हे बुधाच्या अमलाखाली येते. अंकगणित आणि वाणिज्य शाखा बुधाच्या अमलाखाली येते. व्यवसायामध्ये विमा एजंट, म्युच्युअल फंड सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट, शेअर मार्केट सल्लागार हे व्यवसाय बुधाच्या अमलाखाली येतात. नोकरीमध्ये बँकिंग क्षेत्र चांगले मानवते. नुकत्याच आपल्या प्रदर्शित झालेल्या पु. ल. दशपांडे ह्यांच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिले कि त्यांच्या कुंडलीत दशमस्थानी गुरूने दृष्ट, शुभ असा बुध असल्यामुळे लिखाण आणि वक्तृत्व ह्यात त्यांनी उत्तम कार्य केले. पु. लं. ची पूर्ण पत्रिका पाहण्यासाठी त्यांच्या नावावर क्लिक करा.   

गुरु – गुरु हा सर्वोत्तम शुभग्रह आहे. दशम स्थानात तो असणे म्हणजे उत्तम यशाची हमी, अर्थातच पापग्रहांचा संयोग नसल्यास. गुरु हा शिक्षणाचा कारक आहे. शिक्षण संस्था स्थापन करणे, त्याच्या संचालक पदी असणे हे व्यवसाय स्वरूप असू शकतात. गुरु हा हायर व्यवस्थापकीय कौशल्य दर्शवतो. त्यामुळे मॅनेजर पद हे गुरूच्या अमलाखाली येते. नोकरीमध्ये उच्चपदस्थ होण्याचे योग असतात. गुरु हा परोपकाराची कारक ग्रह असल्यामुळे सामाजिक संस्थेचा संस्थापक असणे हा योग सुद्धा येतो. राजकारणापेक्षा समाजकारण अशा व्यक्तींना मानवू शकते.  

राहू आणि केतू – राहू हा शनीप्रमाणे आणि केतू हा मंगळाप्रमाणे फळे देतो असे मानतात आणि काही अंशी तशीच फळे मिळत. परंतु माझ्या वैयक्तिक अनुभवनानुसार काही ठोकताळे सांगतो.

राहू हा ग्रह लोअर व्यवस्थापकीय कौशल्य देतो तसेच समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य त्यात आहे. लोअर व्यवस्थापकीय कौशल्य अशा अर्थाने म्हणता येईल कि साइटचा सुपरवायजर, ठेकेदार, कार्यकर्त्यांचा गटप्रमुख, असे काही वेगळे फलादेश माझ्या पाहण्यात आहे.

केतू हा मंगळाप्रमाणेच फळे देतो परंतु तो दशमात असता जातकाला स्वस्थ बसून देत नाही. जातक व्यवसायात सतत बदल करत जातो. अशा जातकाने नोकरी करणेच बरे, परंतु त्याला मनासारखे करिअर करता येत नाही हा अनुभव आहे. काही कुंडल्यांमध्ये केतू विषम राशीत, दशमात खूप चांगली फळे देतानाही  उदाहरणार्थ , तुळेतील अथवा धनु राशीतील केतू.

हे सर्व ग्रह एकेकटे फळं देऊ शकत नाही बाकीचे अन्य ग्रह त्यांची होणारी युती, ग्रहांची दृष्टी, राशींचा प्रभाव, जन्मरास, लग्नेश ह्या सर्वांवरून व्यवसायाच्या बाबतीत एकमत करता येऊ शकते. नोकरीचा विचार करता, षष्ठ स्थान महत्वाचे ठरते कारण ते दशमस्थानाचे भाग्यस्थान आहे. षष्ठ स्थान उत्तम असल्यास नोकरी अथवा व्यवसायात भाग्योदय होतोच परंतु दशम स्थान बलवान नसले तरी नोकरीत नक्कीच यश मिळते. दशमस्थान हे कर्मस्थान आहे, कर्तृत्वाचे स्थान आहे, स्वावलंबी होण्याचे स्त्थान आहे. ते बलवान नसले आणि षष्ठ स्थान बलवान असेल, तिथे शुभ ग्रह असेल तर नोकरी केलेली बरी.

दहावी आणि बारावी ऍडमिशन पूर्वीच सल्ला घ्या…

अत्यंत महत्वाचे….

१) ह्या शास्त्राची निर्मिती ज्या वेळेस झाली त्यावेळच्या समाजरचनेनुसार करिअर करण्याचे पर्याय कमी होते. त्यावेळेस वर्ण व्यवस्था अस्तित्वात होती. त्यामुळे ग्रंथात दिल्याप्रमाणे जशीच्या तशी तत्वे लागू नाहींहोऊ शकत. देश, काल, परिस्थिती नुसार शास्त्रांची तत्वे कशी वापरायची ह्यात बदल करावाच लागतो. अन्यथा कुंडली परीक्षण चुकते.

२) आपले अर्थार्जन केव्हा, कसे आणि किती होईल हे पूर्वकर्मानुसार निश्चितच असते, परंतु आपण घेत असलेल्या निर्णयांमुळे त्यात कमी जास्त पण होतो. म्हणूनच पत्रिका पाहून सल्ला घेतल्यास आपल्याला काही प्रमाणात कोणत्यावेळेस व्यवसाय आणि नोकरीच्या संदर्भातले निर्णय घ्यावेत ते समजते.

३) अनेक वेळा ज्योतिषाला प्रश्न केला जातो कि व्यवसाय कोणता करावा? तेव्हा दशमस्थानात, नवमांश कुंडलीत आणि दशमांश कुंडलीत जे ग्रह दशमस्थानी बलवान होतात त्यांचे कारकत्व देश, काळ, परिस्थिती पाहून निवडावे. उदाहरण घ्यायचे झाले तर दशमस्थानी शुक्र आणि सूर्य आहे म्हणून टेप रेकॉर्डर विकण्याचा सल्ला आज २०१८ साली दिला तर तो मूर्खपणा ठरेल कारण आजचा काळ हा प्रगत म्युझिक सिस्टिम वापरण्याचा आहे त्यामुळे काळाचा विचार हवा. असेल हरी तर दिल खाटल्यावरी म्हणून चालणार नाही.   

 ४) अनेकवेळा नोकरी कधी लागेल? हा प्रश्न असतो. हा प्रश्न पूर्ण नाहीये. ह्याचे कारण असे कि आपल्याला नोकरी कधीही लागू शकते! पण आपली कोणती नोकरी करण्याची तयारी असते? हा मुख्य प्रश्न असतो. उदाहरण घेऊयात. उच्चविद्याविभूषिताने नोकरी कधी मिळेल हा प्रश्न ह्या अर्थाने विचारला असतो कि माझ्या मनाप्रमाणे नोकरी कधी मिळेल. इंजिनीरिंग झालेला पदवीधर, जेथे कामगाराची नोकरी आहे तो तिथे नक्कीच काम करणार नाही. त्यामुळे जेव्हा ज्योतिष “नोकरी ह्या काळात लागेल” असे सांगतो तेव्हा तो इच्छेप्रमाणे नोकरी लागेल असे सुचवतो. त्यामुळे सांगितलेल्या कालावधी आधी नोकरी लागल्यास असे समजू नये कि फलित चुकले.

करिअरला योग्य दिशा देण्यासाठी आणि दहावी-बारावी नंतर करिअरचे काय ते ठरवण्याची संपर्क करा.

करिअरमध्ये येणाऱ्या अडचणींवर उपाय …

व्यवसाय आणि नोकरी करताना प्रत्येकालाच अडचणी येतात. काही स्वतःमुळे निर्माण होतात तर काही जाणूनबुजून निर्माण केल्या जातात. स्पर्धेच्या आजच्या काळात अडचणी निर्माण करणारेच जास्त असतात.  

नोकरी मिळवणे आणि व्यवसायात टिकणे येथे प्रतिस्पर्ध्यावर मात करणे हा अर्थ आहे. म्हणून शत्रूवर विजय मिळवणे ह्यासंदर्भात उपासना असावी.  

१) व्यवसायामध्ये आर्थिक वृद्धी अपेक्षित असते त्यासाठी “महालक्ष्मी आराधना” अत्यावश्यक आहे.

२) नोकरीमध्ये अपेक्षित बढती अथवा पगारवाढ होण्यात अडथळे होत असतील तर विघ्नहर्त्या “गणेशाची उपासना” अथवा “मारुतीची उपासना” करावी.

३) नोकरीच्या ठिकाणी अथवा व्यवसायात शत्रूचे त्रास असतील तर “कालभैरव उपासना” करावी.

असे अनेक उपाय करता येतील परंतु श्रद्धा हवीच. सद्गुरुंचे मार्गदर्शन असल्यास उत्तमच! आपल्या संसाराच्या गाडीचे पेट्रोल म्हणजे धन! संसार सुरळीत आणि उत्तम व्हावा ह्यासाठी धनाची आवश्यकता असतेच आणि धनप्राप्तीसाठी स्थिर नोकरी किंवा व्यवसाय असणे आवश्यक आहे. कमी वेळेत, कमी कष्टात काहीच सध्या होत नाही हे सत्य जरी असले तरी कुंडली पाहून योग्य ठिकाणी कष्ट केल्यास त्या कष्टाचे चीज लगेच होऊ शकते.         

This article is written by the best astrologer in Pune and karad, Mr. Onkar Kulkarni. To spread the knowledge, please share this post and give your feedback.          

 

व्यवसाय/नोकरीचे मार्गदर्शन कुंडलीवरून…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *